13 April 2016

चरित्रसुधा - ६


श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )

श्रीगुरुकृपा उखा उजळली :-


दरवर्षीप्रमाणे १९५४ साली पू. मामा पंढरीच्या वारीला गेले. ते ज्या दिंडीतून जात त्या देशमुख महाराजांच्या दिंडीचे व्यवस्थापक ह. भ. प. यशवंतराव वैद्य मास्तर म्हणून होते. तेही ज्ञानेश्वरीचे अभ्यासक असल्याने त्यांचे पू. मामांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते दरवेळेस पू. मामांना वारीनंतर सोलापूरला आपल्या घरी येण्याची विनंती करीत. पण मामा तोवर कधी हो म्हणाले नव्हते. त्यावर्षी मात्र ते लगेच हो म्हणाले व त्याप्रमाणे आषाढी एकादशी झाल्यावर सोलापूरला वैद्य मास्तरांच्या घरी गेले. दुपारचे भोजन झाल्यावर सोलापूर पाहण्याच्या उद्देशाने सहज फिरायला गेले. परत आले तर घराबाहेर चपलांचा ढीग लागलेला. मोठ्या आश्चर्याने मामा जिना चढून गेले. तेथे तिस-या मजल्यावर एक शांत, तेजस्वी सत्पुरुष व्याघ्राजिनावर बसलेले दिसले. त्यांना पाहताच ज्योतिषाच्या वेगळ्याच ऊर्मीने पू. मामा एकदम बोलून गेले की, " यांच्या पत्रिकेत पंचमात बुध-चंद्र युती असणारच. "
पू. मामांचे शब्द कानी पडल्यावर त्या सत्पुरुषांनी मामांना जवळ बोलावले. मामा देखील एका अनामिक ओढीने खेचले गेले. त्या सत्पुरुषांनी आपल्या आसनावरच थोडे सरकून मामांना बसवून घेतले आणि म्हणाले, " सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज व आपल्या मातुःश्रींची आपल्यावर पूर्णकृपा आहे ! " त्याबरोबर पू. मामांचे डोळे मिटले गेले आणि त्यांना तीव्र भस्रिका होऊ लागली. त्यानंतर जवळपास दीड तास प. पू. मामा प्रगाढ समाधीत होते. समाधीतून उठल्यावर मात्र त्यांनी त्या सत्पुरुषांच्या श्रीचरणांवर आपल्या अश्रूंनी अभिषेक केला व दंडवत घातला. ते सत्पुरुष म्हणजेच प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचे शिष्योत्तम व श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, योगिराज श्री. वामनरावजी गुळवणी महाराज हे होते. त्यांना पाहिल्यावरच पू. मामांना अंतरीची खूण पटली व पूर्वी मातु:श्रींनी दीक्षा दिली त्यावेळसारखाच समाधीचा अनुभव पुन्हा आल्यावर तर पक्की खात्री झाली की, हेच आपले मंत्रगुरु आहेत.
लगेचच श्रीगुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर प. पू. श्री. मामांना योगिराज श्री. गुळवणी महाराजांनी, प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांकडून आलेला सांप्रदायिक महामंत्र शक्तिपातपूर्वक प्रदान केला. त्याचबरोबर परंपरेचे उत्तराधिकारही लेखी प्रदान केले. पू. श्री. गुळवणी महाराजांना त्याच दिवशी पहाटे प. प. श्री. टेंब्येस्वामींचे साक्षात् दर्शन झाले व ते म्हणाले, " श्रीपाद आमचीच विभूती आहे, त्याला सांभाळावे. त्याला कुरवपूरला अनुष्ठानासाठी पाठवावे. तेथे त्याला श्रीदत्तप्रभूंचा कृपाप्रसाद लाभेल. "
श्रीगुळवणी महाराजांच्या अनुग्रहानंतर पू. मामांची साधना आणखी तीव्रतेने सुरू झाली. त्यांचे कुरवपूरचे अनुष्ठानही फारच अप्रतिम झाले. त्या अनुष्ठानासंबंधी स्वतः मामांनीच अतिशय अद्भुत लेखन करून ठेवलेले असून ' तीर्थदर्शन ' नावाच्या त्यांच्या ग्रंथात छापलेले आहे. या काळात त्यांना अद्भुत दर्शने झाली. तसेच स्वतः भगवान श्रीश्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी दिव्य पादुका प्रसाद दिला. त्या अतिदिव्य पादुकांची त्यांनी शेवटपर्यंत पूजा-अर्चा केली व त्यांच्या देहत्यागानंतर त्यांनीच पूर्वी देवांची जशी परवानगी घेतलेली होती त्यानुसार, त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. या पादुकांच्या अभिषेक तीर्थाने अनेक भक्तांना अद्भुत अनुभव आलेले होते, अनेकांच्या व्याधी, पिशाचबाधा त्या तीर्थाने नष्ट झाल्या होत्या. आश्चर्य म्हणजे पू. मामांच्या घराण्यात असा दिव्य पादुकाप्रसाद त्यांच्या वडिलांना व आजोबांनाही प्राप्त झालेला होता. श्रीदत्तप्रभू सलग तीन पिढ्या पादुकारूपाने या घराण्यातील महापुरुषांकडून सेवा स्वीकारत होते.
कुरवपूरच्या अनुष्ठानानंतर भगवंतांच्या आज्ञेने त्यांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. प्रथम दक्षिणेकडील तीर्थे, अष्टविनायक, जगन्नाथपुरी, गया, काशी करून हिमालयातील चार धाम करून मग ते पुन्हा आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी पुण्यात परतले. सद्गुरु श्रीगुळवणी महाराजांना पू. मामांना मिळालेला श्रीपादुकाप्रसाद पाहून अतीव आनंद झाला. त्यांनी पुढील बारा वर्षे तीव्र साधना करण्याची आज्ञा केली. पू. मामांनी देखील ती आज्ञा तंतोतंत पाळली.
कुरवपूरच्या अनुष्ठानाला जाण्यापूर्वी श्रीगुळवणी महाराजांच्या आज्ञेने पू. मामा माउलींची प्रार्थना करण्यासाठी आळंदीला आले होते. त्याचवेळी भगवान श्रीज्ञानेश्वर माउली समाधीतून प्रत्यक्ष प्रकटले आणि त्यांनी पू. मामांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून अनुग्रह केला. अशाप्रकारे प. पू. श्री. मामा हे श्रीदत्त, श्रीनाथ आणि श्रीभागवत (वारकरी) अशा तिन्ही प्रमुख संप्रदायांचे श्रेष्ठ अध्वर्यू ठरले. त्यांच्या ठिकाणी श्रीदत्तसंप्रदायाच्या दोन परंपराशाखा, मातु:श्रींकडून राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांची शाखा व श्रीगुळवणी महाराजांकडून भगवान श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामी - प. प. टेंब्येस्वामींची शाखा, शिवाय श्रीमाउलींकडून नाथ व भागवत संप्रदाय व श्रीगुळवणी महाराजांकडून शक्तिपात संप्रदाय, अशा तिन्ही संप्रदायांच्या पाच परंपरा शाखांचा, पंचामृताचा अद्भुत संगम झालेला होता. एकाचवेळी इतक्या शाखांचा एकाच ठिकाणी संगम झालेला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. प. पू. श्री. मामांच्या अनेक लीलावैशिष्ट्यांपैकी हे एक प्रमुख वैशिष्ट्य होते !
संप्रदाय सेवा-कार्य :-
सद्गुरु श्रीगुळवणी महाराजांनी प. पू. श्री. मामांना त्यांच्या दीक्षासमयीच इतरांना दीक्षा देण्याचे अधिकार लेखी दिलेले असले तरी १९६१ सालापर्यंत मामा कोणलाही दीक्षा देत नसत. १९६१ साली मिरजेत एका प्रसंगाने अचानक त्यांच्याकडून पहिली दीक्षा झाली. त्यानंतर मात्र ईशकृपेने त्यांचे दीक्षाकार्य फार मोठ्या प्रमाणावर वाढले. श्रीगुळवणी महाराजांचे जवळपास ७० हजार अनुगृहीत होते. प. पू. श्री. मामांच्याकडून ७४ हजार साधकांना दीक्षा झाल्या त्यांच्या हयातीत.
योगिराज श्रीगुळवणी महाराज देखील अनेक साधकांना प. पू. श्री. मामांच्यावर सोपवत. " प. पू. श्री. मामा आणि आम्ही काही भिन्न नाही ", असे श्रीमहाराजांनी अनेकांना सांगितलेले होते. एवढे असूनही पू. मामा प्रत्येकवेळी दीक्षा झाल्यावर साधकांना आवर्जून सांगत की, " आम्ही दीक्षेसाठी निमित्त झालेलो असलो तरी आपले श्रीगुरु योगिराज श्रीगुळवणी महाराजच आहेत. " पू. मामांनी आपले शिष्यपणच शेवटपर्यंत मनापासून जपलेले होते. त्यांनी कधीच गुरु होऊन मिरवले नाही.
प. पू. श्री. मामांना ह. भ. प. श्री. केशवराव महाराज देशमुखांनी स्वप्नात येऊन त्यांच्या ग्रंथांची प्रकाशन करण्याची व त्यांच्या घरात पुन्हा ज्ञानेश्वरी प्रवचने करण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे प. पू. श्री. मामांनी सद्गुरु श्रीगुळवणी महाराजांच्या संमतीने, ' ज्ञानेश्वरीचे सुलभ गद्य रूपांतर ' हे देशमुख महाराजांचे पुस्तक ३ खंडांत प्रकाशित केले, नारदभक्तिसूत्रे, अभंगमालिका अशी त्यांची इतरही काही पुस्तके तसेच ' संतकृपा प्रतिष्ठान ' व ' संतकृपा ' मासिकाची सुरूवात केली. देशमुख माडी विकत घेऊन ' श्रीज्ञानेश्वरी निवास ' असे नामकरण करून श्रीगुळवणी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करून तेथे नित्य प्रवचने सुरू केली.
श्रीगुळवणी महाराजांनी एकदा प. पू. श्री. मामांना विचारले, " तू सार्वभौम राजाचा प्रधान होऊन राहणार की स्वतंत्र राजा होणार? " प. पू. श्री. मामा उत्तरले, " मी मांडलिक राजा होणार. " त्यावर श्रीगुळवणी महाराज म्हणाले, " ठीक आहे, मग संप्रदाय कार्यासाठी तू स्वतंत्र पीठ स्थापन कर, आमचे पूर्ण आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. श्रीदत्तप्रभू प्रचंड कार्य करवून घेतील तुझ्याकडून! " श्रीमहाराजांचे हे शब्द जसेच्या तसे खरे ठरलेले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
श्रीगुरुमहाराजांच्या या आदेशानुसार प. पू. श्री. मामांनी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी जवळ जागा विकत घेऊन तेथे एक वास्तू निर्माण केली. २६ डिसेंबर १९७३ रोजी या ' माउली ' आश्रमाची वास्तुशांती झाली. श्रीगुळवणी महाराज आजारी असल्याने प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या पादुका आणवून त्या अधिष्ठानाखाली सर्व सोहळा संपन्न झाला. माउलीच्या वास्तुशांतीनंतर लगेचच प. पू. श्री. गुळवणी महाराजांनी १५ जानेवारी १९७४ रोजी नश्वर देहाचा त्याग केला.
प. पू. श्री. मामांनी श्रीगुळवणी महाराजांकडून आलेल्या परंपरेचे उत्तमरित्या जतन संवर्धन करून जगभर विस्तारही केला. १९७३ साली ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसार कार्यासाठी ते इंग्लंडला देखील जाऊन आले होते. तेथे अनेकांना दीक्षा झाल्या, संत वाङ्मयाचे मार्गदर्शन झाले. पू. मामा नेहमी म्हणत असत, " आमच्या संप्रदायात दीक्षेचा प्रचार प्रसार नाही. फक्त तत्त्वज्ञानाचा व संतवाङ्मयाचा, ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आम्ही करतो. ' ये लेने देने की नही होने पाने की बात है । ' भगवंतांच्या इच्छेशिवाय व जीवाची कर्मसाम्यदशा आल्याशिवाय आणि त्याचा गुरूंशी पूर्व ऋणानुबंध असल्याशिवाय कधीही दीक्षा होत नसते. " त्यामुळे सरसकट सामुदायिक दीक्षा देणे किंवा घाऊक भावात दीक्षा देणे, हे श्रीगुळवणी महाराजांना व पू. मामांना अजिबात मान्य नव्हते. ते असल्या गोष्टींचा कडाडून विरोध करीत. पण आता कलियुगाचेच फळ म्हणून या अद्भुत दीक्षा संप्रदायाचे प्रसिद्धी व पैसा यांच्या तीव्र वासनेपायी तथाकथित गुरुबाजी करणा-या मंडळींनी पार बाजारीकरण करून टाकलेले आहे. पण हे कधीच या थोर महात्म्यांना मान्य नव्हते.
याच संप्रदाय सेवाकार्याचा एक मुख्य भाग म्हणून विविध ठिकाणी साधकांची साधना शिबिरे आणि तीर्थयात्रांचे आयोजन केले जात असे. शिवाय परंपरेतील महात्म्यांच्या जयंती-पुण्यतिथी उत्सवांच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम संपन्न होत असत. प. पू. श्री. मामांची या सर्व कार्यासाठी प्रचंड भ्रमंती होत असे. अवघा भारत देश त्यांनी या कार्यासाठी पिंजून काढला, श्रीस्वामी समर्थ महाराजांचे, श्री. टेंब्येस्वामी महाराजांचे, श्रीगुळवणी महाराजांचे नाव आणि उज्ज्वल कीर्ती त्यांनी दशदिशांत पोहोचवली.
प. पू. श्री. मामांना यज्ञ-यागादी उपासनांचेही अतीव प्रेम होते. देश-धर्म-जनहितार्थ त्यांनी अनेक यज्ञ-याग संपन्न केले. नवचंडी, शतचंडी, महारुद्र, लक्ष्मीयाग, गणेशयाग, श्रीदत्तमालामंत्र स्वाहाकार, विष्णुयाग आदी विविध ठिकाणी संपन्न झाले. श्रीगुळवणी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी श्रीनृसिंहवाडी क्षेत्री १९८४ साली अतिभव्य अतिरुद्र स्वाहाकार संपन्न केला. हा ' न भूतो न भविष्यति ' झालेला यज्ञसोहळा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या यागामध्ये एक अलौकिक घटना घडली होती. श्रीगुळवणी महाराजांनी पू. मामांना सांगितले होते की, " यागात आम्ही उपस्थित राहू! " प्रत्यक्षात हा याग महाराजांनी देह ठेवल्यानंतर आठ वर्षांनी झाला. त्याच्या अवभृथ स्नान यात्रेत हत्तीवरून पू. मामांची मिरवणूक चालू होती. त्यावेळी अचानक अलौकिक प्रकाशाचा लोळ पू. मामांसमोर प्रकटला व खाली ब्रह्मवृंदाच्या मध्ये त्यातून श्रीगुळवणी महाराज साकारले. पू. मामांनी त्यांना तेथूनच वाकून नमस्कार केला. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले व ते अदृश्य झाले. सर्वात मोठे आश्चर्य तर पुढे आहे, त्या प्रसंगाचा नेमका कोणीतरी फोटो काढला ज्यात श्रीगुळवणी महाराज स्पष्ट दिसतात. तो फोटो पू. मामांच्या ' रूपसुधा ' या छायाचित्र संग्रहात प्रकाशित केलेला आहे.
पू. श्री. मामांनी संप्रदायसेवा म्हणून शुद्ध परमार्थाच्या प्रचार प्रसारासाठी प्रचंड कष्ट करून अनेक ग्रंथ प्रकाशित केले, त्यासाठी त्यांनी श्रीवामनराज प्रकाशनाची स्थापना केली. सव्वादोनशे ग्रंथ प्रकाशित करणारे हे प्रकाशन आजमितीस सर्व आध्यात्मिक प्रकाशन संस्थांमध्ये अग्रगण्य मानले जाते. एकाहून एक सुंदर व बोधप्रद ग्रंथ या प्रकाशनाने प्रकाशित करून पू. मामांचे दिव्य स्वप्न सत्यात उतरवलेले आहे. ( क्रमश: )

1 comment:

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates