16 April 2016

चरित्रसुधा - ७



( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
‘‘ आई, श्रीज्ञानेश्वर माउली ‘ पायाळू ' हा शब्द वापरतात. ‘पायाळू’चा नेमका अर्थ काय गं? ’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘ सख्या, सांग बरे आपण ‘ मायाळू ’ कोणाला म्हणतो? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणा-या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू. पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्वविख्यात सत्पुरुष, प. पू. श्री. श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराज हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, १ एप्रिल २०१६ रोजी पू. श्री मामांची २६ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गेले सात दिवस आपण या श्रीदत्तब्रह्माचे अद्भुत चरित्र सविस्तर पाहात आहोत. आज त्याचा कळसाध्याय आहे.
प. पू. मामांनी आपली संपूर्ण हयात जनता जनार्दनाची नारायणभावाने सेवा करण्यात खर्ची घातली. आपल्या ज्योतिष व वैद्यकी या दोन विद्यांचा विनामोबदला उपयोग करून लाखो जीवांना सौख्याचा मार्ग दाखविला. त्यांनी लोकांवर उपकार करण्यात कधीच आपला-परका असा भेद केला नाही.
पू. मामा जरी निष्कपट भावाने सर्वांचे अखंड हितच पाहात असले तरी, त्यांच्याही वाईटावर टपलेले लोक होतेच. अशा नराधमांनी पू. मामांवर तीन वेळा सायनाईड सारख्या भयंकर विषाचा प्रयोग केला. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने पू. मामा त्या जीवघेण्या विषप्रयोगांमधून सहीसलामत बाहेर आलेे. म्हणून त्यांना सद्यकाळातील नीलकंठच म्हणायला हवे. शेवटी दुर्जनांनी कितीही प्रयत्न केले तरी भगवंतच साक्षात् आपल्या प्रिय भक्तांचे संरक्षण करीत असल्याने, त्यांचे काहीही वाकडे करता येत नाही कोणालाच.
प. पू. श्री. मामासाहेब हे भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘ माउली ' हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या शब्दन् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन मांडू शकत असत. इतकी ज्ञानेश्वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता.
माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, विलक्षण रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व परमभक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू. मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणा-या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू. मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘ श्रीज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार ’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे पू. मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत.
प. पू. मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘ श्रीवामनराज प्रकाशन ’ नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस सव्वा दोनशे पुस्तके प्रकाशित करून ना नफा तत्त्वावर, सवलतीच्या दरात त्यांची विक्री करणारी श्रीवामनराज प्रकाशन ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू. मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे.
भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दृष्टांतानुसार, पू. मामांनी श्रीगुरुचरित्राची सर्वजनसुलभ व संपादित पाठावृत्ती तयार केलेली आहे. या " श्रीगुरुचरित्र नित्यपाठ " नावाच्या ग्रंथाच्या आजवर दहापेक्षा जास्त आवृत्या प्रकाशित झालेल्या असून स्त्री-पुरुष सर्वांनाच याचे पारायण करण्याची मुभा आहे. या ग्रंथाला प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचाच आशीर्वाद असल्याने याच्या पारायणाचे मूळ श्रीगुरुचरित्राच्या पारायणाइतकेच अद्भुत फळ मिळते. शिवाय मूळ चरित्रापेक्षा पेक्षा ओवीसंख्या कमी असून नियमही थोडे सोपे आहेत, हे याचे मुख्य वैशिष्ट्य होय. भगवान श्रीमाउलींचेही " श्रीज्ञानदेव विजय " हे चोवीसशे ओव्यांचे अद्भुत चरित्र त्यांनी रचलेले आहे. आजवर माउलींचे असे पारायणेसाठी चरित्र उपलब्धच नव्हते. या सुरेख व रसाळ चरित्रग्रंथाने ही उणीवही भरून काढलेली आहे. याशिवाय पू. मामांच्या प्रवचनांवर आधारित ग्रंथही अभ्यासक व साधकांमध्ये खूप प्रसिद्धी पावलेले आहेत. भगवान श्रीमाउलींच्या कृपापसायामृताचे हे सर्व शब्दधन अत्यंत मनोहर असून नित्यचिंतनीयच आहे.
प. पू. श्री. मामांनी आपल्या हयातीतच ' श्रीपाद सेवा मंडळ ' या संस्थेची संरचना केलेली होती. परंतु रितसर नोंदणी मात्र प. पू. श्री. मामांच्या देहत्यागानंतर झाली. प. पू. सौ. शकुंतलाताई आगटे व प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनानुसार सध्या जगाच्या पाचही खंडांमध्ये श्रीपाद सेवा मंडळाचे कार्य विस्तारलेले असून लाखो साधक साधनामार्गावर अग्रेसर आहेत. भारतातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून देव, देश आणि जनसेवा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
श्रीदत्तयोग्याचे महानिर्वाण :-
१९८८-८९ साली प. पू. श्री. मामांचे अमृतमहोत्सवी वर्ष भारतभर फार मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. पुणे, सांगली, बेळगांव, भिलाई, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पंढरपूर, वर्धा, पणजी, डोंबिवली, क-हाड इत्यादी ठिकाणी प. पू. श्री. मामांचे सत्कार समारंभ झाले. विविध मान्यवर, संत-सत्पुरुष, पीठाधिपतींनी आवर्जून येऊन प. पू. श्री. मामांच्या गौरवपर भाषणे केली. प. पू. श्री. मामांवर ' पैल मेरूच्या शिखरी, कैवल्यलेणे, अमृतकण आणि कौस्तुभ ' असे चार गौरवग्रंथही प्रकाशित झाले. अमृतमहोत्सवी वर्ष विविध कार्यक्रम आणि सत्कारांनी अक्षरशः गाजले.
प. पू. श्री. मामांनी आपल्या परंपरेचे उत्तराधिकार प. पू. सौ. शकुंतलाताई आगटे आणि प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांना पूर्वीच देऊन ठेवलेले होते. या दोघांच्याच मार्गदर्शनाखाली संप्रदाय सेवेचा सर्व कार्यभार व्यवस्थितपणे चालू होता. अमृतमहोत्सवानंतर मात्र प. पू. श्री. मामांना पैलतीराचे वेध लागले. त्या सुमारासच त्यांना राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे दर्शन झाले व त्यांनी आयुष्य वाढवून देऊ का? असे विचारले. त्यावर पू. मामांनी, " देवा, काया शिणली आहे, आयुष्य वाढवून नको आम्हांला. आता आपल्यातच कायमचे सामावण्याची इच्छा पूर्ण करा ", अशी विनंती केली. त्यानुसार पू. मामांनी आपल्या देहत्यागाची तिथी निश्चित केली व काही जवळच्या भक्तांना सांगूनही ठेवली होती.
पू. मामांनी अगदी शेवटच्या काळात पाटण तालुक्यातील कोयनानगर जवळील श्रीक्षेत्र दत्तधाम येथ भगवान श्रीदत्तप्रभूंच्या साक्षात्कारानुसार द्वितीय दत्तावतार भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पूर्णाकृती श्रीमूर्तीची स्थापना केली. या स्थानीच प्राचीन काळी भगवान परशुरामांनी भगवान श्रीगोरक्षनाथांना श्रीविद्येचा उपदेश केलेला असल्याने ही फार थोर तपोभूमीच आहे. आज श्रीक्षेत्र दत्तधाम हे महाराष्ट्रातील दक्षिण गिरनार म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहे.
फाल्गुन कृष्ण नवमी, दि. २१ मार्च १९९० च्या पहाटे तीन वाजता पू. मामांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. आज या घटनेला सव्वीस वर्षे पूर्ण होत आहेत.
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज व प. पू. श्री. मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. प. पू. मामा प. पू. काकांना गुरुस्थानीच मानत असत. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प. पू. मामा प. पू. काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा होत असे. प. पू. काकांनी एकदा प. पू. मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प. पू. मामा नेहमीच प. पू. काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
गेले सात दिवस आपण या श्रीपादचरित्र गंगेमध्ये प्रेमादरे अवगाहन करीत आहोत, हे आपले परमभाग्य आहे. हिमालयाची उंची किंवा महासागराची खोली जशी कधीच जोखता येत नाही तशीच संतचरित्रांची महतीही कधी सांगून पूर्ण होत नाही. त्यांचा अवाका इतका मोठा असतो की मानवी कक्षेत तो कधी मावतच नाही. पण माउली म्हणतात तसे, गंगेचे एक घोटभर तीर्थ घेतल्यानेही प्रत्यक्ष गंगेचेच पान केल्याचे सुफळ मिळते, तसे संतचरित्रांच्या यथाशक्य आस्वादनानेही आपल्याला अमृतमय होता येते. मुक्याने गूळ खाऊन त्याचा आस्वाद जसा मनातल्या मनातच पचवायचा असतो, तशी ही संतचरित्रे आतल्या आत सुखाने उपभोगायची असतात. त्यांचा अवर्णनीय आनंद कधीच कमी होणारा नसतो, तो त्या चरित्रांच्या सतत अनुसंधानाने चौपटीने वाढतो. त्यात प. पू. श्री. मामांसारख्या महान अवतारी महात्म्यांचे चरित्र तर अलौकिकतेलाही अप्रूप वाटावे असे अद्भुतरम्य असते. तेच आपण गेले सात दिवस मोठ्या भाग्याने आस्वादत आहोत. म्हणून आज प. पू. मामांच्या सव्विसाव्या पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक साष्टांग नमस्कार घालून, झालेली ही चरित्रचिंतनाची सेवा मनोभावे समर्पित करून, आपण त्या अम्लान, सर्वतीर्थास्पद श्रीचरणींच त्यांच्या पावन स्मरणाच्या परमानंदात मग्न होऊन निरंतर सुखी होऊया !!
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री. मामा महाराज की जय ।
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
( कालच्या लेखात उल्लेख केलेल्या अद्भुत चमत्काराचा संदर्भ असणारे, पू. श्रीगुळवणी महाराज अतिरुद्र यागाच्या अवभृथ स्नान यात्रेत प्रकट झाल्याचे छायाचित्र आजच्या फोटोमध्ये घेण्यात आलेले आहे. फोटोमधील गोलात श्रीगुळवणी महाराज स्पष्ट दिसतात.
प. पू. श्री. मामांचे वाङ्मय ३०% सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क क्रमांक - श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - 020-24356919 ) 

1 comment:

  1. pujyaniya Mamanna pahile nahi tari tyanchya baddalchya lihilelya lekhanatun tyanche mahanasitva janvat rahate.aaj hi te apalyaat aahet ase vatat asate.

    ReplyDelete

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates